Adulteration in Milk : दुधात (Milk) होणाऱ्या भेसळीविरुद्ध (Adulteration) कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहिम राबविण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांनी दिले आहेत. त्यानुसार मराठवाडा विभागातील  सर्व आठ जिल्ह्यात दुध तपासणीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे, सर्व दुध विक्रेते, दुध व दुग्धजन्य पदार्थ, उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीच्या दुध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


राज्यातील दुध भेसळ रोखण्याच्या अनुंषगाने 28 जून रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्या नुसार दुधात होणाऱ्या भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी असतात तर अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र यांची सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार आता धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. 


18 ऑगस्ट रोजी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  घेण्यात आली. या बैठकीस दुग्धव्यवसाय विकास विभाग आयुक्त एस.आर. शिपुरकर, उपआयुक्त (प्रक्रिया व वितरण) तसेच सर्व प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी, दूध भेसळीविरुद्ध धडक मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तपासणी दरम्यान दुधामध्ये कसलीही भेसळ आढळुन आल्यास अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घेवुन विभागातील सर्व दुध विक्रेते, दुध व दुग्धजन्य पदार्थ, उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीच्या दुध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


सणासुदीच्या काळात भेसळ वाढते...


पुढील काही काळात सणासुदीचे दिवस आहे. त्यामुळे अशा काळात दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची अधिक शक्यता असते. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत. मात्र, चोरट्या मार्गाने सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभागासह दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Lumpy Skin Disease: लम्पीबाबत दिरंगाई केल्यास तात्काळ कारवाई करणार; तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा