पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जेतून प्रेरणा मिळाल्याचं मागील वर्षी क्रीडा मंत्री बनलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. पंतप्रधान रात्रंदिवस काम करतात आणि संपूर्ण देश फिट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या कामात व्यायामाचा समावेश करण्याबाबत सांगतात, असं राठोड म्हणाले.
यासाठी राज्यवर्धन राठोड यांनी नागरिकांना व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. राठोड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्वत:च्या कार्यालयातच पुश अप्स करताना दिसत आहेत. राठोड यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेसबाबत जागरुक करताना 'हम फिट तो इंडिया फिट' हा नाराही दिला आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी या मोहीमेत हृतिक, सायना आणि कोहलीला नॉमिनेट केलं आहे. नेटीझन्स राज्यवर्धन राठोड यांच्या मोहीमेचं कौतुक तर करत आहेतच, तर त्याला उत्तर म्हणून व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओही पाठवत आहेत.
स्वत: एक खेळाडू असलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी नेमबाजीत रौप्यपदकही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारची मोहीम सुरु झाल्याने त्याचा नक्कीच प्रभाव पडू शकतो.