मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो.


त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोल आज 76.87 रुपये प्रति लिटर आहे, जो दर सर्वात महाग आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोल 76.06 रुपये प्रति लिटर होतं.

कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेलचे दर

नरेंद्र मोदी 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा पेट्रोल देशात 71.41 रुपये प्रति लिटरने विकलं जात होतं. तर मे 2014 मध्ये डिझेल 55.49 रुपये प्रति लिटर होतं. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 106.85 डॉलर प्रति बॅरल होती.

सध्या काय परिस्थिती?

दिल्लीत पेट्रोल आज 76.87 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 68 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. एवढी महाग विक्री इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.

आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत काय आहे?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलर प्रति बॅरल आहे. म्हणजे 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाची किंमत 25 टक्क्यांनी कमी आहे. (2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 106.85 डॉलर प्रति बॅरल होती.)

याचाच अर्थ असा होतो, की मनमोहन सिंह सरकारने कच्चे तल 106.85 डॉलर प्रति बॅरल या दराने खरेदी करुनही पेट्रोल 71.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55.49 रुपये प्रति लिटरने विकलं.

तर या नियमाने 80 डॉलर प्रति बॅरल दर असताना भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती असावी?

या नियमानुसार मोदी सरकारने मनमोहन सिंह सरकारसारख्या दरानेच पेट्रोल विकलं असतं, तर पेट्रोलची किंमत 53.47 रुपये प्रति लिटर (दिल्लीतला दर) असती. म्हणजे आजच्यापेक्षा 22.77 रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळालं असतं. तर डिझेललाही हाच नियम लागू केला, तर डिझेल 41.54 रुपये प्रति लिटरने विकलं असतं, म्हणजेच डिझेल 26 रुपयांनी स्वस्त मिळालं असतं.

संबंधित बातम्या :

एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली का?


1 लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकार तुमचा खिसा कितीला कापतं?