Rishabh Pant : उत्तराखंडमधील रुरकीमध्ये रेल्वे आपली जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहे. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने आपली जमिनी वाचवण्यासाठी लोकांच्या घराबाहेर खांब उभा केले आहेत. यात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) घराचा देखील समावेश आहे. रेल्वेने ऋषभ पंतच्या घराबाहेर देखील खांब उभारले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केल्याचे सांगितले जात आहे. रुरकीच्या धांधेरामध्ये चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. आपली हद्द लक्षात येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खांब उभा केले आहेत. परंतु, हे खांब उभारल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना अडचणी येत आहेत. स्थानिक लोकांनी घराच्या फोटोंस ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अनेकांनी ऋषभच्या घरासमोरील खांबाचे फोटो ट्विट केले आहेत. सरकार आपल्या देशातील खेळाडूंचा असाच आदर करते का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. नेटकऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग करून प्रश्न विचारले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंतच्या घरासमोर खांब बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना काही लोकांनी विरोध केला. परंतु, आम्ही आमचे काम करत आहोत, हे सरकारी काम आहे. यात कोणी अडथळा आणू नये असे सांगत सबंधित अधिकाऱ्यांनी हे खांब उभा केले आहेत. ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली ती जागा उत्तराखंडमधील धांडोरा रेल्वे स्थानकाच्या जमिनी आहेत. रेल्वेने या जमिनींवर आधीच खांब रोवले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांत लोकांनी हे खांब हटवून तेथे अतिक्रमण केले आहे. अनेकांनी येथे पार्किंग केले आहे. बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम राबवून हद्दीचे सीमांकन करण्यासाठी नवीन खांब बसवले आहेत.
Rishabh Pant : ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर
उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच उत्तराखंड सरकारने ऋषभ पंतला राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले होते. राज्यातील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ऋषभ पंतची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून दिली होती. यानंतर दोघांचाही एकत्र फोटो समोर आला असून ऋषभ पंतनेही या जबाबदारीवर आनंद व्यक्त केला होता. असे असताना रेल्वेच्या कारवाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत ऋषभ पंत किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या