मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 'द वॉल' म्हणजेच माजी कर्णधार राहुल द्रविडचा आयसीसीच्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. राहुल द्रविड हा सन्मान मिळवणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे. द्रविडच्या आधी सुनिल गावसकर, बिशन सिंग बेदी, कपिल देव आणि अनिल कुंबळे या खेळाडूंना हा सन्मान मिळाला आहे.
यावर्षीच्या (2018) 'हॉल ऑफ फेम'मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटर क्येलर टेलर यांचा समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडच्या डब्लिनमध्ये आसीसीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 'हॉल ऑफ फेम'च्या नावांची घोषणा करण्यात आली. आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'द वॉल इज इन द हॉल' या शब्दात द्रविडचा गौरव केला आहे.
भारत-अ संघाच्या कोचिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे द्रविड या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही. मात्र एका व्हिडीओद्वारे राहुल द्रविडने आयसीसीचे विशेष आभार मानले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत द्रविडचा समावेश आहे.
द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 52.31च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 36 शतकं आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्रविडने 344 सामन्यात 10,889 धावा केल्या असून यामध्ये 12 शतकं आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडने आपल्या कारकिर्दीत केवळ एक टी-20 सामना खेळला आहे.