Lionel Messi : काही लोक हे खेळांमुळे ओळखले जातात, तर काही लोकांच्या खेळामुळे त्या खेळाला ओळखलं जातं. असच काहीसं नातं आहे फुटबॉल आणि त्याचा अनभिषिक्त सम्राट लिओनल मेस्सीचं (Lionel Messi). जगभरातील देशांत फुटबॉल माहित आहे आणि त्याचा स्टार म्हणून मेस्सीला ओळखलं जातं. जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सीचा खेळ म्हणजे मंत्रमुग्ध करणारा...पण हाच मेस्सी लवकरच निवृत्त होणार आहे. त्याने स्वत:च यंदाचा कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक 2022 हा त्याचा अखेरचा विश्वचषक असणार हे स्पष्ट केलं आहे. ईएसपीएनशी (ESPN-Argentina) बोलताना मेस्सीने हे वक्तव्य केलं आहे.


35 वर्षीय मेस्सीने आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आजही कोणत्याही तरुणाला लाजवेल असा खेळ मेस्सीचा आहे. पण आता लवकरच तो निवृत्ती घेणार असं दिसून येत आहे. त्यात इतक्या अप्रतिम खेळीनंतरही मेस्सीला आजवर एकदाही आपल्या देशाला अर्जेंटीनाला विश्वचषक जिंकवून देता आला नाही. त्यानंतर आता यंदाचा विश्वचषक त्याचा अखेरचा असेल हे त्याने स्वत: सांगतिलं असून तो म्हणाला,"हा नक्कीच माझा शेवटचा विश्वचषक आहे. मला शारीरिकदृष्ट्या चांगलं वाटत आहे, मी या वर्षी प्री-सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी करू शकलो, जे मी गेल्या वर्षी करू शकलो नाही. मी जिथे आहे तिथे पोहोचणे आवश्यक होतं ते देखील चांगल्या मनस्थितीने. पण यंदाचा विश्वचषक माझा अखेरचा विश्वचषक असेल हे नक्की आहे.''


7 बलॉन डी'ऑर जिंकणारा मेस्सीचं विश्वचषक आजही स्वप्न


आता फ्रान्स लीगमधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट जर्मनमध्ये खेळणारा मेस्सी आजही तितकाच दमदार खेळ करत आहे. फुटबॉल जगतातील मानाचा बलॉन डी'ऑर हा खिताब मेस्सीने सर्वाधिक 7 वेळा मिळवला आहे. पण असं असलं तरी आजही अर्जेंटिना देशाला विश्वचषक जिंकवूण देण्याची त्याची इच्छा अपूर्ण आहे.  


नोव्हेंबरमध्ये सुरु होणार सामना


फुटबॉलचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडणार आहे. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार विश्वचषक सुरु होण्याची तारीख बदलली असून एक दिवस आधी सामने सुरु होणार आहेत. आधी 21 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी स्पर्धा आता 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सुरु होणार आहे.


हे देखील वाचा-