Mumbai Crime News : महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अखेर 100 दिवसांच्या प्रयत्नानंतर बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. 


100 हून अधिक दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी गमदेवी पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी लैंगिक छळाच्या गुन्ह्याचा शोध लावला. पोलिसांनी याप्रकरणी 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी 32 वर्षांचा असून, मूळचा भदोही उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपी चित्रकार म्हणून काम करत होता आणि तो मुंबईच्या फूटपाथवर राहायचा.  घटनेनंतर तो यूपीला पळून गेला होता.  तो कोणताही फोन वापरत नाही आणि त्यामुळे तो शोधण्यात पोलिसांना अडचण येत होती.


 17 जून 2022 रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास, एका व्यक्तीने 23 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासमोर स्वत:चे कपडे काडून आक्षेपार्ह वर्तन केले. पीडित तिच्या कुत्र्यासह केनेडी पुलाखाली फिरत होत्या तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला.  भादंवि कलम 509 अन्वये गुन्ह्याची नोंद गमदेवी पोलीस ठाणे येथे करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतण्यास सुरुवात केली. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि प्रमुख बसस्थानक, रेल्वे स्थानके आणि झोपडपट्टी भागात वॉन्टेड आरोपीचे पोस्टर लावल्यानंतर, आरोपी डीबी मार्ग आणि व्हीपी रोडच्या परिसरात दिसल्याचा माहिती मिळाली. त्यानंतर बुधवारी पोलीस पथकानं त्याला एका फूटपाथवरून अटक केली. 100 दिवसानंतर आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर पीडितेने मुंबई पोलिसांसाठी खास चिठ्ठी लिहिली आहे. त्या महिलेनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या महिलेनं मुंबई पोलिसांनाही टॅग केलेय.  


पीडितेने इन्स्टाग्रामवर काय पोस्ट केले -
आज या घटनेला जवळपास 5 महिन्यानंतर त्याच व्यक्तीचे फोटो घेऊन गमदेवी पोलीस स्टेशनचे संदिप माने यांनी संपर्क साधला.  त्याला खात्री होती की तो योग्य व्यक्ती आहे आणि जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा खात्री झाली की हा तोच आरोपी आहे.  मी हार मानली होती, पण गमदेवी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या आरोपीचा शोध घेणं सोडले नाही.  त्यांनी केलेल्या सर्व प्रयत्नांबद्दल मी मुंबई पोलिसांची सदैव ऋणी आहे. त्यांनी माझ्या तक्रारीला किती प्रतिसाद दिला, पाठपुरावा करताना ते किती तत्पर होते आणि व्यक्ती सापडेपर्यंत ते कसे थांबले नाहीत. तुम्हाला अशाच घटनेची तक्रार करण्यास संकोच वाटत असल्यास, किंवा त्याबाबत पोलिसांकडे जाण्यात काही अर्थ आहे का असे वाटल्यास, मी तुम्हाला तसे करण्यास प्रोत्साहित करते.  तुम्ही तात्काळ परिणामांची अपेक्षा करू शकत नाही, परंतु तुम्ही अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची अपेक्षा करू शकता. ज्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एकटे बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला अधिक सुरक्षित वाटेल.