मुंबई : भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कोरिया ओपन सुपर सीरीजच्या विजेतेपदानं सिंधूला चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर विराजमान केलं आहे.


टोकियातील जपान ओपन सुपर सीरीजमध्ये सिंधूचं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानं तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली होती. पण बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सिंधूनं मिळवलेल्या दुसऱ्या क्रमांकानं तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

भारताची लंडन ऑलिम्पिकमधल्या कांस्यविजेत्या सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीतलं बारावं स्थान कायम राखलं आहे. तर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिला पाचवं स्थान टिकवण्यात यश मिळालं आहे.

दुसरीकडे जागतिक चॅम्पियन जपानची नोजोमी ओकुहार नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानी पोहोचली आहे.

पुरुषांच्या यादीत किदांबी श्रीकांत आठव्या स्थानी कायम असून, साई प्रणीथ आणि एच.एस.प्रणयची आपल्या स्थानावरुन घसरण झाली आहे. तर अजय जयरामची घसरण होऊन, 20 व्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे.