सिंधूनं उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईचं आव्हान दोन सरळ सेट्समध्ये मोडीत काढलं. चेन युफेईसोबतचा हा सामना 21-7, 21-14 असा जिंकून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला.
यंदाच्या मोसमात सिंधूला विजेतेपदानं वारंवार हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात विजेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याचा सिंधूचा प्रयत्न राहील. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे.
याआधी 2017 आणि 2018 साली सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण 2017 ला जपानच्या नोझोमी ओकुहारानं सिंधूचा विजेतेपदाचा रस्ता रोखला होता. तर 2018 साली स्पेनच्या नंबर वन कॅरोलिन मरिननं सिंधूला पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित ठेवलं.
सध्याच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू पाचव्या तर ओकुहारा दुसऱ्या स्थानावर आहे. सिंधू आणि ओकुहारा आजवरच्या कारकीर्दीत 15 वेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यात आठ वेळा सिंधूनं तर सात वेळा ओकुहारानं बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीत ही जोडी पाचव्यांदा एकमेकांशी भिडणार आहे. याआधीच्या चार फायनल्सपैकी दोन सिंधूनं तर दोन ओकुहारानं जिंकल्या आहेत. त्यामुळे जागतिक बॅडमिंटनच्या फायनलमध्ये तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे.
यंदाचा मोसम जेतेपदाच्या बाबतीत सिंधूसाठी निराशाजनक राहिला आहे. इंडोनेशिया ओपन वगळता तिला एकाही स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नव्हती. इंडोनेशिया ओपनमध्येही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे सिंधूचा विजेतेपदाचा यंदाचा दुष्काळ आतातरी संपणार का याचीच उत्सुकता आहे.
बी. साईप्रणितचं आव्हान संपुष्टात
सिंधूसोबतच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत मात्र भारताच्या बी. साईप्रणितचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. जपानच्या अव्वल मानांकित केन्टो मोमोटानं साईप्रणितचा संघर्ष दोन सरळ सेट्समध्ये मोडीत काढला. साईप्रणितला मोमोटाकडून 21-13,21-8 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे साईप्रणितला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पण जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत कांस्यपदक पटकावणारा साईप्रणित हा प्रकाश पदुकोणनंतरचा दुसराच भारतीय ठरला. प्रकाश पदुकोण यांनी 1983 साली जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं.