गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिका या परस्पर विरोधी राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. ईव्हीएम असो किंवा काश्मीरमधील 370 कलम याबाबत शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेच्या विपरीत भूमिका अजित पवार यांनी आधी मांडली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
ईव्हीएमबाबत शरद पवार यांच्या मनात शंका असताना अजित पवार यांनी मात्र ईव्हीएम वर शंका नसल्याचे म्हटले होते. तर काश्मीरमधील 370 कलम ज्या पद्धतीने हटवले याला शरद पवार यांनी विरोध केला तर या निर्णयाचे स्वागत अजित पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेत केले.
त्यामुळे आता पक्षाच्या कार्यक्रमात भगवा झेंडा पण फडकवला पाहिजे ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? शरद पवार यांना भगवा झेंडा मान्य आहे का? की ही पक्षाची भूमिका नसून फक्त अजित पवार यांची भूमिका आहे हे अजून स्पष्ट व्हायचं आहे.
दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादीने भगवा झेंडा हाती घेतला याचे स्वागत केले तरी याबाबत जरा उशीर झाला असा टोमणाही अजित पवार यांना लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर अजित पवार यांची पावलं कुठे पडत आहेत असा सूचक इशारा करत सवाल केला आहे. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी मनगटात घड्याळ नाही तर भगवा सांभाळण्याची ताकद लागते असा टोला अजित पवार यांना लगावला आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भगवा झेंडा कुणाची मक्तेदारी नसल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये, सभांमध्ये राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत आता भगवा झेंडाही सहभागी होणार आहे, अशी घोषणाच अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात कॅमेरासमोर बोलायला नकार दिला. या घोषणेसंदर्भात तुम्ही अजित पवारांनाच विचारा, ते तुम्हाला विस्तृतपणे सांगतील, असं मत त्यांनी कॅमेऱ्यासमोर न येता व्यक्त केलं.