पुण्यातील गहुंजे मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन 'आज तक' या वृत्तवाहिनीने समोर आणलं आहे.
या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे.
बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना निलंबित करण्यात आलं. शिवाय साळगावकर यांना खेळपट्टीवर जाण्यास बंदी घालण्यात आली.
दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा सामना पूर्वनियोजित वेळेत होईल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.
कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले?
पत्रकाराने पिच क्युरेटरला आपल्या दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये काही बदल करण्यास सांगितलं, त्यावर पांडुरंग साळगावकर लगेचच तयार झाले. जे पिच आम्ही तयार केलंय, त्यावर 337 धावसंख्या होऊ शकते. या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करता येऊ शकतो, असं पिच क्युरेटर म्हणाले.
रिपोर्टरच्या सांगण्यावरुन पांडुरंग साळगावकर त्यांना पिच दाखवण्यासही तयार झाले. मात्र नियमानुसार, सामन्याआधी पिचवर कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. तसंच मी काही मिनिटांत पिचचं स्वरुप बदलू शकतो, असंही पिच क्युरेटर म्हणाले. पिचवर जर थोडी माती किंवा पाणी टाकलं किंवा पिचवर बुटं घासली तरी पिच खराब होऊ शकते. इतकंच नाही तर खिळे असलेले शूज घालून पिचवर जाण्यासही त्यांनी परवानगी दिली.
पुण्याचं पिच कसं आहे?
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं पिच फिरकी गोलंदाजांसाठी चांगलं समजलं जातं. इथे गोलंदाजांना मदत मिळते. मागच्या वेळी इथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता.
मात्र पुण्याचं पिचवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल जेवढा वळत होता, तेवढा आता वळणार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही संघ पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेईल, कारण संध्याकाळी दव पडतं, त्यावर सामन्याचा निकाल ठरु शकतो.
पुण्यात MCA स्टेडियमवर आतापर्यंत दोन सामने
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आतापर्यंत टीम इंडियाने दोन वन डे सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात टीम इंडिया विजयी झाली आहे, तर एका सामन्यात पराभूत. 2013 साली खेळलेल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 72 धावांनी पराभूत केले होते. तर यंदा जानेवारी महिन्यात इंग्लंड विरोधातील सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवला होता.
कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले. साळगावकरांनी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती.
1971-72 या पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये साळगावकरांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी कपमध्येही त्यांनी 'रेस्ट ऑफ इंडिया'साठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहेत. अजित वाडेकरांसह सहा विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या.
जानेवारी 1974 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1974-75 मध्ये दलिप ट्रॉफीच्या उपान्त्य सामन्यात इस्ट झोनचा त्यांनी धुव्वा उडवला.
1974-75 नंतर ते फक्त महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. 1980-81 मध्ये बडोद्याविरुद्ध त्यांनी ठोकलेलं शतक हे त्यांच्या कारकीर्दीचं हायलाईट म्हणता येईल.
निवृत्तीनंतर साळगावकर पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. सध्या ते पुण्यातील 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम'चे मुख्य पीच क्युरेटर आहेत. महाराष्ट्र रणजी टीमचे मुख्य निवडकर्ते म्हणून काम पाहिलं आहे.
भारतासाठी सामना जिंकणं आवश्यक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना आज दुपारी 1.30 वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईतील सामन्यात सहा विकेट्सनी पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघावर मालिका गमावण्याचं वादळ घोंघावत आहे.
विराट ब्रिगेडसाठी या सामन्यात 'करो या मरो'ची परिस्थिती आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पुणे वन डेमध्ये विजय आवश्यक आहे. कागदावर न्यूझीलंडचा संघ टीम इंडियापेक्षा कमकुवत वाटत असला तरी मैदानावर कोणत्याही संघाला पराभूत करण्याची धमक त्यांच्यात आहे, हे मुंबईतील सामन्यातून दिसलं आहे.
संबंधित बातम्या
पिच क्युरेटरचं स्टिंग, कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
खिळ्याचे शूज घालून पिचवर, कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले?