मुंबई : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर शिक्षकांची पगारवाढ ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळण्याची हमी होती. मात्र सरकारच्या ठरावानुसार यापुढे शिक्षकांना आणखी एका निकषाला पात्र ठरावं लागणार आहे.
12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या प्राथमिक (इयत्ता पहिली ते पाचवी), उच्च प्राथमिक (सहावी ते आठवी) शिक्षकांना ही अट लागू असेल. राष्ट्रीय मानक आणि मूल्यमापन (शाळा सिद्धी) उपक्रमात संबंधित शाळेला अ श्रेणी मिळाली असेल, तरच शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळू शकते.
शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता यासारख्या बाबींवर शाळांना मिळणारी श्रेणी अवलंबून असते.
माध्यमिक शाळेच्या शिक्षकांसाठी (इयत्ता नववी आणि दहावी) विद्यार्थ्यांचा सक्सेस रेट 80 टक्क्यांपेक्षा अधिक असायला हवा. पात्र शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. मात्र हे निकष काढून टाकण्याची मागणी राज्यभरातील शिक्षकांनी केली आहे.
संपूर्ण शाळेच्या कामगिरीवर शिक्षकांचं मूल्यमापन कसं काय केलं जाऊ शकतं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पगारवाढ ही कामगिरीवर अवलंबून असावी, मात्र शिक्षकांच्या वैयक्तिक कामगिरीवर वेतन ठरावं, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
शिक्षकाची 12 वर्षांची सेवा पूर्ण झाली, मात्र शाळेने आवश्यक ते निकष पाळले नाहीत, तर त्यात शिक्षकाचा काय दोष, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार पगारवाढ, शिक्षकांची नाराजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2017 08:15 AM (IST)
12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळण्याची हमी होती. मात्र सरकारच्या ठरावानुसार यापुढे शिक्षकांना आणखी एका निकषाला पात्र ठरावं लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -