राजकोट: मुंबईच्या पृथ्वी शॉनं राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खणखणीत शतकी पदार्पण केलं. अवघ्या 18 वर्षाच्या पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या आणि पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावलं. विंडीज गोलंदाजांनी पृथ्वी शॉच्या फलंदाजीसमोर अक्षरश: प्रदक्षिणा घातली. फिरकी असो की वेगवान गोलंदाज पृथ्वी शॉने विंडीज गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवत शतक झळकावलं.


कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं 99 चेंडूंत 15 चौकारांच्या सहाय्यानं आपलं शतक साजरं केलं.


पृथ्वी शॉचं एक शतक, अनेक विक्रम खिशात! 

या शतकासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम मोडीत काढले. पृथ्वी शॉने रणजी चषक, दुलीप करंडक आणि कसोटी या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतकं ठोकली आहेत.

पृथ्वी शॉचं वय हे 18 वर्षे 329 दिवस आहे. 9 नोव्हेंबर 1999 रोजी जन्मलेला पृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकरने हा पराक्रम गाजवला होता. सचिनने 17 वर्ष 107 दिवस वय असताना कसोटी शतक झळकावलं होतं. मात्र सचिनचं ते पदार्पणातलं शतक नव्हतं.

पृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा जगातील चौथा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशचा मोहम्मद अश्रफूल हा जगातील सर्वात युवा क्रिकेटपटू आहे ज्याने पदार्पणात, वयाच्या 17 वर्ष 65 व्या दिनी शतक झळकावलं होतं.

त्यानंतर झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मस्क्दझाने 17 वर्ष 354 व्या दिवशी शतक, पाकच्या सलिम मलिकने 18 वर्षे 328 व्या दिनी शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता 18 वर्षे 329 दिवस वयाचा पृथ्वी शॉचा नंबर लागला आहे.

उपहारापर्यंतच अर्धशतक

मुंबईच्या पृथ्वी शॉनं राजकोट कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसं पदार्पण केलं आहे. उपहारापर्यंत त्यानं अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळं टीम इंडियाला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 133 धावांची मजल मारता आली होती. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी पृथ्वी 75 धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीला अकरा चौकारांचा साज होता. कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो आजवरचा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. पुजारानं 74 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली.

कोहलीने टॉस जिंकला

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या राजकोट कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटीत संपूर्ण भारताचं लक्ष 18 वर्षीय पृथ्वी शॉच्या पदार्पणाकडे लागलं होतं. पृथ्वी शॉ आणि के एल राहुल भारताकडून सलामीला उतरले. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने तीन फिरकीपटू आणि दोन मध्यमगती गोलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव या फिरकीपटूंचा तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी या मध्यमगती गोलंदाजांचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटूच खेळवल्याने शार्दूल ठाकूरला बाहेर बसावं लागलं. अंतिम 11 जणांमध्ये 5 फलंदाज, 5 गोलंदाज आणि 1 विकेटकीपर ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेचं वेळापत्रक

भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 3 ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिकेत भिडणार आहेत. वनडे सीरिजचा पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी, दुसरा 24 ऑक्टोबरला इंदूर, तिसरा 27 ऑक्टोबरला पुणे, चौथा 29 ऑक्टोबरला मुंबई आणि पाचवा 1 नोव्हेंबरला थिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया - विराट कोहली, के एल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव