मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. ही वन डे जिंकून, पाच सामन्यांच्या मालिकेत आपली आघाडी आणखी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीने पहिल्या वन डे सामन्यात भारताचा विजय आणखी सोपा केला होता.
गोलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष
भारतीय फलंदाजांना गवसलेला हा सोनेरी सूर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून कायम आहे. पण गुवाहाटीच्या वन डेत भारतीय गोलंदाजांनी बजावलेली कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. मोहम्मद शमीचा टप्पा आणि त्याची दिशा कायमच भरकटलेली राहिली. उमेश यादवला हैदराबाद कसोटीत लाल चेंडूने दाखवलेली करामत पांढऱ्या चेंडूने दाखवता आली नाही.
खलील अहमदचा अनुभवच तोकडा ठरला, तर अनुभवी रवींद्र जाडेजाला विंडीज फलंदाजांच्या बॅट्सना वेसण घालता आली नाही. त्यामुळे जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला दिलेल्या विश्रांतीचा फटका टीम इंडियाला बसतो की काय, असं चित्र गुवाहाटीत निर्माण झालं होतं.
टीम इंडियाच्या सुदैवाने विराट आणि रोहितने वैयक्तिक शतकं झळकावलीच, पण 246 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया घातला. त्या दोघांनी रचलेली भागीदारी इतकी वेगवान होती की, विराटसेनेने 323 धावांचं अतिविराट लक्ष्यही तब्बल 47 चेंडू आणि आठ विकेट्स राखून ओलांडलं.
भारतीय फलंदाजांची ताजी कामगिरी विशाखापट्टणम वन डेत विजयाचा विश्वास देणारी आहे. पण फलंदाजांचं काम हलकं करायचं, तर भारतीय गोलंदाजांनाही या वन डेत कंबर कसण्याची गरज आहे. आगामी विश्वचषकाची पूर्वतयारी सुरू असताना गोलंदाजाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
विराटला मोठा विक्रम नोंदवण्याची संधी
विराट कोहलीचा ताजा फॉर्म आणि सातत्य विशाखापट्टणमच्या वन डेत त्याला आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवण्याची संधी देईल. विराटने या सामन्यात 81 वी धाव घेतली की, वन डे क्रिकेटच्या दुनियेत तो 10,000 धावांचा टप्पा गाठेल. ही कामगिरी बजावणारा तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरेल. पण विशेष म्हणजे वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात 10,000 धावांचा पल्ला सर्वात जलद ओलांडण्याचा विश्वविक्रम विराटच्या नावावर होईल.
वन डेच्या इतिहासात भारताच्या सचिन तेंडुलकरने सर्वात जलद म्हणजे 259 डावांमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठला आहे. भारतीय कर्णधाराला विशाखापट्टणमच्या वन डेच्या निमित्ताने 204 व्या डावात तो पराक्रम गाजवण्याची संधी आहे.
विराट कोहलीने वन डे क्रिकेटच्या इतिहासातला दस हजारी मनसबदार हा मान मिळवतानाच, टीम इंडियाला जिंकूनही दिलं, तर त्या विजयाचा आनंद दीर्घकाळ स्मरणात राहिल.
विशाखापट्टणम वन डेत विराट कोहलीला विश्वविक्रम करण्याची संधी
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
24 Oct 2018 09:51 AM (IST)
कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीने पहिल्या वन डे सामन्यात भारताचा विजय आणखी सोपा केला होता. पण त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची विंडिजच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आता आपल्या कामगिरीवर लक्ष देण्याचं आव्हान असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -