मुंबई : मी-टू अंतर्गत आरोप करुन झाल्यानंतर आता आपल्याला यात पुढे काही करायचं नाही, बोलायचं नाही, मला हे सारं विसरायचं आहे. मात्र इतरांनी त्यावर बोलावं, त्याला आपली हरकत नाही. ही पीडितेची भूमिका योग्य आहे का? असा सवाल मंगळवारी हायकोर्टाने उपस्थित केला.


'मी माझ्या आरोपांवर ठाम आहे, पण या खटल्यातून मला बाहेर ठेवा, मला या संदर्भात पुढे काही कारवाई करण्याची इच्छा नाही' असं स्पष्ट करत मी-टू अंतर्गत दिग्दर्शक विकास बहलवर आरोप करणाऱ्या पीडीतेच्या वतीने हायकोर्टात कबुली जबाब सादर करण्यात आला. कोण याबाबत काय बोलतं? यावर कोणी बोलावं की बोलू नये? याच्याशीही आपलं काही घेणं देणं नसल्याचं तिचं मत वकिलांनी हायकोर्टापुढे मांडलं. यावर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी पीडितेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

निर्देश देऊनही कोर्टापुढे हजर न राहिल्याबद्दल कोर्ट पीडितेविरोधात कारवाई करु इच्छित नाही, मात्र शेवटी जो निकाल लागेल त्यासाठी तिनंही तयार राहावं, अशी ताकीदही हायकोर्टाकडून देण्यात आली.

मंगळवारच्या सुनावणीसाठी अनुराग कश्यपसह विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल हे सारे हायकोर्टात उपस्थित होते. अनुराग कश्यपच्या वतीने हायकोर्टात सांगण्यात आलं की, या सहकारी तरुणीकडून बहलने केलेल्या विनयभंगाची तक्रार आल्यानंतर बहलने स्वत: याची कबुली दिली होती. तसेच घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप होत असून माफी मागून आपण हे सारं प्रकरण संपवू इच्छित असल्याचं म्हटलं होतं. याला त्यांचा आणखीन एक भागीदार मधू मंटेनाही साक्षीदार होता. मात्र मंटेनाच्या वकिलाने यास नकार देत ही कबूली आपल्यासमोर झाली नसल्याचं म्हटलं. ही गोष्ट प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं ही सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानेने हायकोर्टात स्पष्ट केलंय की, विकास बहल हा मद्यपानाच्या समस्येने ग्रस्त आहे. मद्य सेवनानंतर तो कसा वागेल याचा नेम नाही. बहलनं स्वत: अनुराग आणि फँटममधील इतर साथीदारांसोबत यावर उपचार करुन घेणार असल्याचं कबूल केलं होतं. तसेच विकासचा तोल जाण्याची ही काही पहिली घटना नव्हे. याआधीही कंगना राणावत, इम्रान खान यांनीही विकास बहलच्या विक्षिप्त वागण्याबाबत सांगितलं होतं, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

मी-टू प्रकरणात तरुणीने विकास बहलवर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. या संदर्भात विकास बहलनं फँटम फिल्ममधील त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यासह अन्य काही जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. हे दोघेही जण संधीसाधू असून त्यांच्या तथ्यहीन आणि बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणत विकासने दहा कोटींची नुकसान भरपाई मागत हायकोर्टात दावा ठोकला.