नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर महाराष्ट्राची एशियाड सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतचा 'अर्जुन पुरस्कारा'नं गौरव करण्यात आला.


देशातल्या प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारांचा वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न झाला. भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनालाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पण स्मृती सध्या श्रीलंका दौऱ्यावर असल्यानं या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही.

स्मृती आणि राही या दोघींचा खेळ वेगवेगळा आहे, पण त्यांना जोडणारा एक दुवा आहे, तो म्हणजे त्या दोघीही मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. स्मृती सांगलीची, तर राही सरनोबत ही कोल्हापूरची आहे. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी दादू चौगुले यांना कुस्ती खेळातल्या योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

एशियाड सुवर्णपदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने खेलरत्न पुरस्काराच्या निवडीत अन्याय झाल्याचा आरोप करुन, या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. पण केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोर यांना त्याचं मन वळवण्यात यश आलं. त्यामुळे खेलरत्न पुरस्कार सोहळ्याला वादंगाचं किंवा कटुतेचं गालबोट लागलं नाही.

संबंधित बातम्या 

शून्य गुण असलेल्या विराटला खेलरत्न, 80 गुण मिळवूनही पुनियाला पुरस्कार नाही  

विराट कोहली, मीराबाई चानू यांना 'राजीव गांधी खेलरत्न' जाहीर