पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालनं पोलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे पोर्तुगालने युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली.


 
मार्सेईत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रॉबर्ट लेवान्डोवस्कीनं दुसऱ्याच मिनिटाला गोल करुन पोलंडचं खातं उघडलं होतं. पण रिनाटो सान्चेझनं 33व्या मिनिटाला गोल डागून पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. हा सामना आधी निर्धारित वेळेत आणि मग अतिरिक्त वेळेतही 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामुळं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळवण्यात आला.

 
पोर्तुगालकडून रोनाल्डो, सान्चेझ, मोटिन्यो आणि नानीनं पहिले चार गोल केले. तर पोलंडकडून लेवान्डोवस्की, मिलिक आणि ग्लिकनं पहिले तीन गोल केले. मात्र ब्लाझकोवस्कीची पेनल्टी किक पोर्तुगालचा गोलकीपर रुई पॅट्रिसियोनं थोपवून लावली. त्यामुळे पोर्तुगालला विजयाची संधी चालून आली.

 
पाचव्या आणि अखेरच्या किकवर रिकार्डो क्वारेझ्मानं गोल झळकावून पोर्तुगालला युरो कपच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.