मुंबई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. मात्र अनेक दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. तर काहींना संपूर्ण मालिकेत खेळता येणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे. कारण पहिल्याच सामन्यात कर्णदार विराट कोहलीसह तीन महत्वाच्या खेळाडूंचा समावेश नसेल.

विराट कोहली :

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत खेळताना झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून विराट कोहली अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधारच सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.

लोकेश राहुल :

दुखापतीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलामीवीर फलंदाज लोकश राहुलला संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत खेळताना झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी तो लंडनला जाणार आहे.

एबी डीव्हीलियर्स :

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू एबी डीव्हीलियर्स सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.

लासिथ मलिंगा :

श्रीलंकेचा आणि मुंबई इंडियान्सचा मॅच विनर गोलंदाज लासिथ मलिंगा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. श्रीलंकेची सध्या बांगलादेशविरुद्ध मालिका सुरु असल्याने त्याला वेळेवर भारतात येता येणार नाही.

क्विंटन डीकॉक :

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज क्विंटन डीकॉक त्याची आयपीएल टीम दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी एकही सामना खेळू शकणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

जेपी ड्युमिनी :

दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी क्विंटन डीकॉकनंतर आणखी एक मोठा धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी यावर्षी आयपीएलचा एकही सामना खेळू शकणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे.

रविचंद्रन अश्विन :

स्पोर्ट्स हर्नियामुळे पुणे सुपरजाएंट्सचा मॅच विनर गोलंदाज आर. अश्विननेही संपूर्ण आयपीएल मालिकेतून माघार घेतली आहे. मायदेशात झालेल्या एकपाठोपाठ मालिकांमध्ये अश्विनने सर्वाधिक 700 ओव्हर गोलंदाजी केली आहे. एका मोसमात एवढी गोलंदाज करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे या मालिकेतून त्याला विश्रांती दिली जाणं अपेक्षित होतं.

मिचेल मार्श :

भारताविरुद्धच्या मालिकेत दुखापतीला सामोरं गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल मार्श संपूर्ण आयपीएल मालिकेला मुकणार आहे. त्याच्याऐवजी पुणे संघात इम्रान ताहीरचा समावेश करण्यात आला आहे.

मुरली विजय :

भारताचा कसोटीतील सलामीवीर फलंदाज मुरली विजय त्याचा आयपीएल संघ किंग्स इलेव्हन पंजाबकडून एकही सामना खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे त्याने मालिकेतून माघार घेतली आहे.

उमेश यादव :

कोलकाता नाईट रायडर्सचा महत्वाचा गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तो आयपीएलमध्ये सहभागी होईल.

रवींद्र जाडेजा :

गुजरात लायन्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला दोन आठवड्यांची सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे 15 एप्रिनंतर तो संघात सहभागी होईल, अशी माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

मुस्ताफिजुर रहमान :

बांगलादेशचा खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 7 एप्रिनंतर तो संघात सहभागी होईल, अशी माहिती आहे.

संबंधित बातम्या :

मायकल क्लार्क आणि पीटरसन आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत


IPL10 : श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार!


अखेर ईशांत शर्माला खरेदीदार मिळाला!


आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक