मुंबई : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेटचा सामना म्हटला की तमाम चाहत्यांना क्रीडाज्वर चढतो. मैदानावर खेळताना एकमेकांना टशन देणारे दोन संघांमधले खेळाडू मैदानावरच खिलाडूवृत्तीने वागतानाही दिसतात. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.


आशिया चषकात बुधवारी रंगलेल्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मात्र दुबईतील स्टेडियममध्ये युजवेंद्रने दाखवलेलं वर्तन सर्वांच्या काळजाला भिडलं. पाकिस्तानी फलंदाज उस्मान खानच्या बुटांची नाडी सुटली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता चहलने ती शू लेस बांधली.

चहलने दाखवलेली खिलाडूवृत्ती पाहून फक्त भारतीयच नाही, तर पाकिस्तानी चाहत्यांनीही त्याला चिअर केलं. आता, हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिथेही युजवेंद्रवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युजवेंद्रनेही इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करुन 'गेमच्या स्पिरीटसमोर नतमस्तक होत आहे' अशी भावना व्यक्त केली आहे.