Pele Health Update : ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलर पेले यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरात असलेली ट्यूमरची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. न्यूज एजंसी एपीनं दिलेल्या माहितीनुसार, साओ पॉलके अलबर्ट आइंस्टीन हॉस्पिटलनं सोमवारी जारी केलेल्या एका वक्तव्यामध्ये सांगितलं की, सध्या पेले आयसीयूमध्ये आहेत. मंगळवारी त्यांना आयसीयूमधून जनरल रुममध्ये आणण्यात आलं आहे. पेले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, हा एक 'महान' विजय आहे. 


गेल्या आठवड्यातच ट्यूमर असल्याचं समजलं 


दरम्यान, गेल्या आठवड्यात पेले रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. त्या दरम्यान ट्यूमरबाबत समजलं होतं. रुग्णालयानं एका वक्तव्यात म्हटलं की, नियमित कार्डियोवॅस्कुलर आणि लॅबोरेटरी तपासण्यांनंतर ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. 





पेले काय म्हणाले? 


पेले यांनी म्हटलं आहे की, "बरं वाटण्यासाठी आणि डॉ. फॅबियो, डॉ. मिगुएल यांना माझ्या तब्येतीची देखभाल करण्याची परवानगी देण्यासाठी मी माझ्या देवाचे आभार मानतो." ते म्हणाले की, "गेल्या शनिवारी माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मी ज्या टेस्ट्सबाबत सांगितलं होतं. त्यांच्या रिपोर्ट्समधून ट्यूमर असल्याचं निष्पन्न झालं होतं." दिग्गज फुटबॉलर पेले पुढे म्हणाले की, "सुदैवानं, मला तुमच्यासोबत मोठा विजय साजरा करण्याची सवय आहे. मी माझ्या चेहऱ्यावर हास्य, माझे कुटुंबिय आणि मित्र परिवार यांच्यासह आनंदानं हा सामना खेळणार आहे."


पेले यांची कारकिर्द 


पेले म्हणजे, ब्राझिलमधील फुटबॉल खेळाडू आहे. आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. आतापर्यंतच्या इतिहासात पेले एकमेवर असे खेळाडू आहेत, ज्यांनी तीन वर्ल्डकप जिंकले आहेत. त्यांनी 1958, 1962 आणि 1970 मध्ये वर्ल्ड कप जिंकले. तसेच ते 77 गोल डागत ब्राझीलचे सर्वकालीन सर्वोच्च फुटबॉलर म्हणून ओळखले जातात. 2012 मध्ये एका अयशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर त्यांना चालण्या-फिरण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वॉकर आणि व्हिलचेअरचा वापर करावा लागला.