INDvsENG 4th Test : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. लॉर्ड्सनंतर आज टीम इंडियाने इंग्लंडला ओव्हल टेस्टमध्ये पराभूत केले. आजच्या विजयासह भारताने मालिकेत 2-1 आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने जिंकण्यासाठी 10 विकेट्सची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला 210 धावांवर ऑलआऊट करत मालिकेतील दुसरा विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने इतिहास रचत अनेक विक्रम नावे केले.
50 वर्षांनी ओव्हलवर विजय
टीम इंडियाने 50 वर्षे, 13 दिवसांनी कसोटीत ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला. याआधी टीम इंडियाने 24 ऑगस्ट 1971 मध्ये इंग्लंडला ओव्हलवर पराभूत केले होते. या सामन्यात भारताने 4 विकेटने विजय साजरा केला होता. आता भारताने पुन्हा एकदा इंग्लंडला ओव्हलमध्ये 157 धावांनी पराभूत केलं.
इंग्लंडमध्ये 3 विजय साजरे करणारा विराट आशियातील एकमेव कर्णधार
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने मोठं यश संपादित केलं आहे. विराट कोहली हा आशियाचा एकमेव कर्णधार आहे ज्याने इंग्लंडला 3 कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. तीन पैकी दोन विजय एकाच मालिकेत मिळवले आहेत. तर 2018 मध्ये शेवटच्या दौऱ्यात एक सामना विराटच्या नेतृत्वात भारताने जिंकला होता. एवढंच नाही तर विराट कोहली हा आशियाचा एक कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वात ही 20 वी वेळ आहे ज्यात टीम इंडियाने 150 पेक्षा जास्त धावांनी सामना जिंकला आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. त्यापूर्वी, रिकी पॉन्टिंगने 150 धावांनी 18 कसोटी सामने जिंकले होते. भारताने इंग्लंडमध्ये 9 कसोटी विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये भारताने 9-9 कसोटी सामने जिंकले आहेत.
जसप्रीत बुमराह बनला सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
जसप्रीत बुमराहने ओव्हल कसोटीत पाचव्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा गाठला. जसप्रीत बुमराह 100 विकेट्स सर्वात कमी सामन्यात ही कामगिरी केली आहे. बुमराहने ओव्हल कसोटीत पहिल्या डावात दोन बळी घेतले, तर दुसऱ्या डावात ओली पोपला आऊट कर 100 कसोटी विकेट्स पल्ला गाठला. यासह बुमराहने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रमही मोडला. कपिल देव यांनी 25 कसोटी 100 विकेट्स घेतल्या होत्या. तर बुमराहने 24 कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेतल्या.