Pele Funeral News : महान फुटबॉलर पेले (Pele) यांचे 29 डिसेंबर रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या फ्युनरलबाबतची माहिती समोर येत आहेत. पेले यांना अखेरचा निरोप ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियमवर (belmiro stadium) सोमवारी अर्थात 2 जानेवारी  2023 रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना पेले यांचं अखेरचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.


पेले यांचे पार्थिव सोमवारी साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयातून काढण्यात येणार असल्याचे पेले यांचा क्लब सँटोसने एका निवेदनात म्हटले आहे. यानंतर, चाहत्यांच्या त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी सँटोस क्लबचे मैदान बेल्मिरो स्टेडियमच्या मध्यभागी ठेवले जाईल. जिथे चाहत्यांना पेलेंची शेवटची झलक पाहता येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत लोक पेले यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर पेले यांच्यावर सँटोस येथील मेमोरियल नेक्रोपोल अ‍ॅक्युमेनिका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारात फक्त कुटुंबिय सहभागी होणार अशी माहिती समोर आली आहे. पेले यांचे सॅंटोस येथे घर आहे. जिथे त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ घालवला होता.


मागील काही काळापासून पेलेंची प्रकृती ढासळली होती





पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले.  


पेले फुटबॉलचे किंग म्हणून प्रसिद्ध


ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.


हे देखील वाचा-