Nagpur Crime News : ट्युशन क्लासमध्ये शिकण्यासाठी येत असलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला स्पर्श करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपी शिक्षकास तहसील पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश रंजीत निखारे (वय 32, टिमकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तहसील पोलिस (Nagpur Police) ठाण्यांतर्गत 38 वर्षाच्या फिर्यादी महिलेची नववीला शिकत असलेली 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी ऑगस्ट 2022 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान कोचिंग क्लासमध्ये ट्युशनला जात होती. ती ट्युशनवरून उशिराने परत येत असल्यामुळे तिच्या आईने तिला उशिरा येण्याचे कारण विचारले असता, तिने कोचिंग क्लासचे सर माझा गणित विषयाचा एक्स्ट्रा क्लास घेत असल्याचे सांगितले. 


...म्हणून आला आईला संशय


मुलीला मोबाइलवर आरोपी शिक्षकाशी चॅटिंग करताना पाहून तिच्या आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावर मुलीने तिचे कोचिंग क्लासमधील शिक्षक शिकवताना स्पर्श करतात आणि त्यांनी अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचे सांगितले, त्यावर अल्पवयीन मुलीची आई मुलीला घेऊन शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेली असता, आरोपी शिक्षकाने मुलीच्या गालावर चापट मारली होती. त्यानंतर आईने मुलीसह आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.


ई-रिक्षा चालकाची पत्नी पळवली अन् पतीवरही जीवघेणा हल्ला


दुसऱ्या एका घटनेत ई-रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्यानंतर तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली आहे. मोनू ऊर्फ संतोष गौतम निकोसे (35, सावित्रीबाई फुलेनगर) आणि बॉबी गौतम निकोसे (32, रामबाग इमामवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सचिन नरेश धनविजय (41, रामबाग) असे फिर्यादी ई-रिक्षाचालकाचे नाव आहे. 


सचिन सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ई-रिक्षात प्रवासी घेऊन जात असताना आरोपी मोनू आणि बॉबीने दुचाकीवर येऊन सचिनला लाकडी दांड्याने डोक्यावर, पाठीवर, कंबरेवर मारुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला  उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी झालेला ई-रिक्षाचालक सचिनच्या पहिल्या पत्नीचे आरोपी मोनूसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे ती मुलीसह घरातील किमती वस्तू घेऊन मोनूसोबत पळून गेली. तेव्हापासून मोनू आणि सचिनमध्ये नेहमी खटके उडत होते. याच वादातून आरोपींनी सचिनवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी ई- रिक्षाचालक सचिनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 307, 34 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


ही बातमी देखील वाचा...


सुट्ट्यांमध्ये बघावी अशी नागपूर जवळील धार्मिक स्थळे