मुंबई: कसोटी संघात तब्बल 8 वर्षानंतर पुनरागमन करणारा विकेटकिपर पार्थिव पटेलचं टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेनं तोंड भरुन कौतुक केलं आहे. मोहाली कसोटीत पार्थिवनं सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली होती.
पार्थिवचं कौतुक करताना कुंबळे पत्रकारांना म्हणाला की, 'पार्थिव आठ वर्षानंतर खेळत होता. पण तरीही तो अजिबात घाबरलेला नव्हता. त्याला सलामीसाठी विचारण्यात आलं आणि त्यानं चांगलं प्रदर्शनही केलं. त्यांची विकेटकिपिंगही चांगली होती.'
'मी खुश आहे कारण की, तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी न उतरता सलामीला आला. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करता त्यावेळी तुमच्यावर नक्कीच दबाव असतो. पण तरीही त्यानं न डगमगता सलामीला जाऊन चांगली फलंदाजी केली.' असं कुंबळे म्हणाला.
पार्थिवनं मोहाली कसोटीत पहिल्या डावात 42 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा केल्या होत्या.