नवी मुंबई : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून नवी मुंबई पालिकेच्या 80 एसी बसमध्ये स्वाईप मशिनची सुविधा देण्यात आली आहे. तसंच बसस्थानकावर ट्रेनप्रमाणे डिजीटल डिस्प्ले लागणार आहे.
यात बस किती वेळात येणार याची माहिती मिळेल. नवी मुंबईची परिवहन सेवा अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढेंनी या नवीन योजना आणण्यास सुरुवात केली आहे. एवढ्या सेवा कॅशलेस करणारी नवी मुंबई राज्यातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.
ऑनलाइन, डेबिट कार्डद्वारे करभरणा
नोटाबंदीनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका कॅशलेस करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं आहे. आता करदात्यांना क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे कर भरता येणार आहे. यासाठी महापालिकेने NMMC ई-कनेक्ट हे मोबाईल अप तयार केलं आहे.
या अॅपमधून नागरिकांना आपल्या समस्या थेट आयुक्तांसमोर मांडता येतील. कर भरणा पद्धत अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये 40 बँकांचे स्वाईप मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भविष्यात आणखी बँकांचा समावेश केला जाईल, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
अशी करा तक्रार
नागरिकांना मेल आणि अॅपवरून तक्रार करता येणार आहे. तक्रारींचे निराकरण संबंधित अधिकाऱ्यांच्या पातळीवर केले जाईल. या तक्रारींची दाखल त्वरित घेतली गेली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती तक्रार आपोआप वर्ग होणार आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही तक्रार पडून राहिल्यास ती थेट आयुक्तांकडे जाईल.
योग्य चौकशी करून आयुक्त संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करतील. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून मोबाइल अॅपवरदेखील सुविधा आहे. या सुविधेमुळे आता एका क्लिकवर आता परवाने, जन्मनोंद या सेवा उपलब्ध झाल्या आहेत.