National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Paralympic swimmer Swapnil Patil of Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोल्हापूर  कुस्तीसह, नेमबाजी आणि जलतरणामध्ये मोठी परंपरा आहे. स्वप्नीलला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. 


पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. राज्य सरकारनेही त्याचा गौरव केला असून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातून जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, गणपतराव आंदळकर, शैलजा साळोखे हे अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. दरम्यान, वडील संजय पाटील हेच स्वप्नीलचे जलतरण प्रशिक्षक असल्याने पुरस्कारामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील 2006 पासून जलतरण करत आहे. शालेय जीवनापासूनच तो जलतरण करत आहे.  2008 मध्ये त्याने राष्ट्रीय पातळीवर दोन कांस्यपदके भारतीय संघाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याला 2011 मध्ये भारतीय संघाचे दरवाजे उघडले. 


भारतीय संघात निवड होताच त्याने अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत चार सुवर्णपदक जिंकत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण कोरियातील आशियाई गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकले. 


मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार : अचंत शरत कमल


'या' खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचा सन्मान 


सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन (बॉक्सिंग), भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जूडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेट लिफ्टिंग), अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशु), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन).


विशेष म्हणजे यंदा एकाही क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार किंवा खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नाही. क्रिकेट विश्वातून फक्त सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांची केवळ द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीत (लाईफटाईम कॅटेगरी) निवड झाली आहे. दिनेश लाड यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला प्रशिक्षण दिलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या