नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे मार्च महिन्यात पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताने पाकिस्तानच्या 3 नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने टाकलेल्या दबावानंतर भारत सरकारने आपल्या व्हिसा धोरणांमध्ये बदल करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय व्हिसा मिळवणे शक्य होणार आहे.


जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानास्थित दहशतवादी संघटनेनेतील दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणांमुळे भारताकडून पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारला जात होता. परंतु आता तसे होणार नाही.

सर्व पात्र खेळाडूंना भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धांसाठी व्हिसा दिला जाईल, असे लिखीत स्वरुपाचे आश्वासन केंद्र सरकारने मंगळवारी (18 जून) भारतीय ऑलिम्पिक संघ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) दिले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मार्च महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने तीन पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा नाकारला होता. परंतु हे पाऊल भारताला चांगलच महागात पडलं होतं.

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे भारताची तक्रार केली. ऑलिम्पिक संघटनेने पाकिस्तानच्या या तक्रारीची दखल घेतली. त्यानंतर भारताने व्हिसा धोरणांमध्ये शिथिलता आणली नाही तर आगामी काळात भारतामध्ये कोणतीही महत्वाची स्पर्धा आयोजित केली जाणार नाही, असे संघटनेने स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या दबावानंतर भारताला पाकिस्तानबाबतच्या व्हिसा धोरणांबाबत माघार घ्यावी लागली आहे.

आमचा अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेला नाही, पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा | एबीपी माझा