Vinesh Phogat Paris Olympics: दणक्यात ऑलिम्पिकची (Olympic 2024) सेमीफायनल (Olympic Semifinal 2024) जिंकून फायनल गाठलेली भारताची महिला कुस्तीपटू (Indian Female Wrestler) विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आलं आहे. मंगळवारी विनेश फोगाटनं सेमीफायनल जिंकली आणि तिच्यासोबतच संपूर्ण भारतीयांनी गोल्डन स्वप्न पाहिली. सेमीफायनलप्रमाणेच विनेश एका दमात फायनल जिंकून कधी एकदा गोल्ड मेडल देशासाठी घेऊन येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुरडा झाला असून वजन जास्त भरल्यानं विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आलं आहे. 


विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानं भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता. सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं असून आता तिचं सुवर्णभरारी घेण्याचं स्वप्न भंगलं आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचं वजन 50 किलोशी जुळत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) नं म्हटलं आहे की, महिला कुस्ती 50 किलो गटातून विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी अत्यंत खेदजनक आहे. टीमनं रात्रभर केलेल्या प्रयत्नांनंतरही, आज सकाळी तिचं वजन 50 किलोंपेक्षा काही ग्रॅम जास्त होतं. 


नेमकं काय घडलं? 


विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.