Vinesh Phogat Paris Olympics 2024: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली.






अंतिम फेरी गाठल्यानंतर विनेश फोगाटने कुटुंबियांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी विनेश फोगाट आईसोबत बोलताना खूप भावूक झाल्याची दिसून आली. तसेच आईने विनेश फोगाटला सुवर्णपदक आणायचं आहे, असं सांगितलं. यावर हो...असं म्हणत विनेश फोगाटने आईला सुवर्णपदक जिंकण्याचं आश्वासन दिलं.






पंचांनी वॉर्निंग दिली अन्...


पंचांनी विनेश फोगटला वॉर्निंग टाईम दिला होता त्यावेळी विनेशनं गुण केला नसता तर क्यूबाच्या पैलवानाला एक गुण मिळाला असता, त्यामुळं विनेश समोर करो वा मरोची स्थिती निर्माण झाली होती. विनेशनं याच वेळात आक्रमक खेळ करत लागोपाठ 2-2 गुण मिळवले. विनेश फोगटनं डावाची सुरुवात केल्यानंतर आक्रमक खेळ सुरु केला होता. त्यामुळं क्यूबाची पैलवान दबावात बचावात्मक खेळ करत होती. तिला पंचांना वॉर्निंग टाईम दिला, त्यात ती गुण मिळवू शकली नाही. त्यामुळं भारताच्या विनेश फोगटला एक गुण मिळाला. सामन्याचा पहिला टप्पा पार पडला तेव्हा विनेश फोगट 1-0 अशी आघाडीवर होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाय. गुझमान लोपेझ हिनं  आक्रमक खेळ सुरु केला. यावेळी विनेश फोगट थोडी बचावात्मक खेळ करत होती. यामुळं विनेश फोगटला वॉर्निंग टाईम देण्यात आला. विनेश फोगटनं या अर्ध्या मिनिटाच्या वेळात आक्रमक खेळ सुरु केला. याच वॉर्निंग टाईममध्ये विनेशनं 2 गुण घेतले. यानंतर विनेश फोगटनं पुन्हा 2 गुण घेत 5-0 अशी आघाडी घेतली.


भारतीय हॉकी संघाकडून आता कांस्य पदकाची आशा-


भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाला जर्मनीनं 3-2 गोलनं पराभूत केलं. जर्मनीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला. यामुळं भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला. भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, जर्मनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 नं पिछाडीवर होता. भारताचा डिफेंडर अमित रोहिदास वर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती. याचा देखील भारताला फटका बसला. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं. भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. 


संबंधित बातमी:


Paris Olympics 2024: भारताला 4 सुवर्णपदक जिंकण्याची संधी; महाराष्ट्राचा पठ्ठ्याही मैदानात, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक