Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळू शकतं. ऑलिम्पिक 2020मध्ये (Tokyo Olympic) चीनी वेटलिफ्टर होऊ जिहुईने सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. चानूला हरवणाऱ्या होऊ जिहुईची डोप टेस्टिंग केली जाणार आहे. जर ती या टेस्ट मध्ये फेल झाली तर मीराबाई चानू सुवर्णपदकाची मानकरी ठरणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
मीराबाई चानूनं टोकियो ऑलिम्पिकमधील आपलं रौप्य पदक देशवासियांना समर्पित केलं आहे. मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, "काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय"
मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिलं. मीराबाई चानूनं पुढे बोलताना म्हटलं की, "सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते"
मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे. भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.