Khel Ratna Award : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि याच स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया यांच्यासह अकरा क्रीडा दिग्गजांना 'खेलरत्न' पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकीपटू पी श्रीजेश आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही या यादीत समावेश आहे.
क्रीडा जगतातील या 11 दिग्गजांना 'खेलरत्न' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)
रवी दहिया (कुस्ती)
पीआर श्रीजेश (हॉकी)
लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग)
सुनील छेत्री (फुटबॉल)
मिताली राज (क्रिकेट)
प्रमोद भगत (बॅडमिंटन)
सुमित अंतिल (भाला)
अवनी लेखरा (शूटिंग)
कृष्णा नगर (बॅडमिंटन)
एम नरवाल (शूटिंग)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ""खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल."
भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
काय आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरुप?
देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची सुरुवात तीस वर्षांपूर्वी म्हणजे 1991-92 पासून करण्यात आली. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील चार वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.