Swapnil Kusale : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठी मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक पटकावणारा स्वप्निल दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला आहे. स्वप्नील मूळचा कोल्हापूरचा, ऑलिम्पिकमधील त्याच्या कांस्य भरारीनंतर अवघ्या महाराष्ट्राच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अख्ख्या देशाच्या मुखी स्वप्नीलच्याच नावाचा जयघोष आहे. अशातच स्वप्नीलची मॅच त्याचं संपूर्ण कुटुंबिय कोल्हापुरातल्या घरात एकत्र पाहत होते. स्वप्नीलनं कांस्यभरारी घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. स्वप्नीलचे आई-वडील, भाऊ, त्याची आज्जी आणि इतर नातेवाईकांकडून स्वप्नीलवर कौतुकाचा वर्षाव होत होता. 


स्वप्नीलच्या कोल्हापूरच्या घरात त्याच्या आई-वडील आणि इतर नातेवाईकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्याच गर्दीत होती स्वप्नीलची आज्जी. नातवानं सातासमुद्रापार जाऊन विजयाचा झेंडा रोवला, त्यामुळे आज्जींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज्जींच्या चेहऱ्यावर हसू होतं, तर डोळ्यांत आनंदाश्रू होते. आज्जींना बोलायचं खूप होतं, पण त्यासाठी त्यांना शब्द सुचत नव्हते. अशातच स्वप्नील आल्यावर त्याचं कौतुक कसं करणार असा प्रश्न आज्जींना विचारण्यात आला. त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता, आज्जींनी त्याचे मुके घेऊन कौतुक करणार असल्याचं सांगितलं. स्वप्नीलच्या आज्जींनी एबीपी माझाशी खास बातचित केली. 


म्हाया नातवानं करुन दावलं...; स्वप्नीलच्या आज्जीचे डोळे आनंदाश्रूंनी तराळले 


नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जीचे डोळे आंनदाश्रूंनी भरले होते. एबीपी माझाशी बोलताना आज्जी म्हणाली की, "लय चांगलं झालं... म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला... आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय... लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं.." पुढे बोलताना स्वप्नील आल्यानंतर त्याचं कौतुक कसं करणार आज्जींना विचारल्यानंतर त्याचे मुके घेऊन त्याचं कौतुक करणार असल्याचं आज्जींनी सांगितलं. 


पाहा व्हिडीओ : Swapnil Kusale Olympic : माझ्या नातवानं करून दाखवलं! आजीकडून स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक