Tokyo Paralympics 2020 : भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.
सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो देखील एक विक्रम आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला.
टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी महिला नेमबाज अवनी लखेरा (Avani Lakhera) हिने सोमवारी सकाळी सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत सुमारे 7 पदके जिंकली आहेत, यामध्ये 2 सुवर्णपदके आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बरियनने 66.29 मीटर थ्रोसह रौप्य पदक जिंकले. तर श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवक्कूने 65.61 मीटरच्या थ्रोसह कांस्य जिंकले. याच स्पर्धेच्या F-44 वर्गात भारताच्या संदीपने 62.20 मीटर थ्रोसह मोसमातील सर्वोत्तम प्रदर्शन करत चौथे स्थान पटकावले.
टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे. पहिल्या दिवसापासूनच भारताचं प्रदर्शन शानदार होतं. सध्या भारत मेडल टेबलमध्ये 25 व्या स्थानावर आहे. तर 54 सुवर्ण पदकांसह चीन या यादीत अव्वल स्थानी आहे.
संबंधित बातम्या