Singhraj Adana Wins Bronze : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॅरा शूटर सिंहराज अधानानं कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यासोबतच या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आठवर पोहोचली आहे. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात भारतीय खेळाडूंचं हे आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. 


असाका शूटिंग रेंजमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिंहराज अधाना आणि चीनच्या लू शीयोलोंग आमने-सामने आले होते. दोघांमध्येही अटी-तटीचा सामना रंगला होता. परंतु, शेवटी सिंहराजनं धमाकेदार खेळी करत 216.8 अकांसह कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. 



भालाफेकपटू सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी


भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.


सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो देखील एक विक्रम आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला. 


पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी


टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे. अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यासोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं तिसरं पदक निश्चित झालं आहे.