Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची (Paris Olympics 2024) काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. मात्र यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याची घटना घडली आहे. ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परने पदकाचा रंग उडाल्याचा दावा केला आहे. यास्मिन हार्परने सोशल मीडियावर रंग निघालेल्या कांस्य पदकाचा फोटोही शेअर केला आहे. यास्मिनने 100 मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पदकाचा रंग उडाल्याचं म्हटलं आहे. हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच चांगले वाटते. पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा, असं नायजा हस्टनने म्हटलं आहे.
अमेरिकेने पटकावले सर्वाधिक पदके-
ऑलिम्पिकच्या पदकतालिकेवर नजर टाकल्यास अमेरिका अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेने एकूण 126 पदके जिंकली असून यामध्ये 40 सुवर्णपदक, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनने एकूण 95 पदके जिंकली आहेत. यामध्ये 40 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक जिंकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.
लिंग वादात अडकलेल्या इमाने खलीफ सुवर्णपदक जिंकलं-
अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने (Imane Khelif) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात चीनच्या यांग लिऊचा पराभव करून ही कामगिरी केली. या विजयासह इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान इमाने खलीफवरुन गेल्या दिवासांपासून वाद रंगला होता.