Neeraj Chopra Father Reaction: भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशातील पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरजने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करुन पहिलं स्थान मिळवलं. त्याच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. या यशाबद्दल राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र, नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला या खेळासाठी तयार केले आणि कित्येक वर्षांनंतर देशाच्या झोळीत सुवर्णपदक टाकलं.
नीरजच्या वडिलांनी सांगितला संघर्ष
नीरज मूळचा हरियाणाच्या पानिपतचा आहे. संपूर्ण कुटुंब ऑलिम्पिकमधील त्याचा सामना पाहत होता. नीरज जिंकताच त्याच्या घरी लोकांचा ओघ वाढला आणि मिठाई वाटप सुरू झाले. यावेळी वडिलांनी सांगितले की, प्रतिकूल पस्थितीत नीरजने हे यश मिळवले आहे. नीरजचे वडील सतीश कुमार म्हणाले, "सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे. आमच्या भागात क्रीडा सुविधांचा अभाव आहे. तो आपल्या खेळांसाठी घरापासून 15-16 किमी दूर प्रवास करुन जात होता."
सामन्याचा थरार कसा होता?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी सायंकाळी खेळलेल्या भालाफेक सामन्यात नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर अंतर पार केले आणि लीडरबोर्डमध्ये अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 87.58 मीटर भाला फेकला आणि लीडरबोर्डवर स्वत:ला मजबूत केले आणि एका अर्थाने पदक पक्क केलं. तिसऱ्या प्रयत्नात तो केवळ 76.79 मीटर अंतर पार करू शकला. त्याचा चौथा प्रयत्न फॉल ठरला. नीरजचा पाचवा प्रयत्नही फोल ठरला.
नीरजची सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी
ऑलिम्पिकच्या आधीही नीरजला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते आणि 23 वर्षीय खेळाडूने पात्रतेच्या पहिल्याच प्रयत्नात 86.59 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठण्याच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. संपूर्ण देश शनिवारी आशा करत होता की नीरज देशासाठी सुवर्ण आणेल आणि तो अपेक्षांवर खरा उतरला. या सुवर्णपदकासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 वर गेली आहे.