नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल (125 किलो गट) मध्ये पदक जिंकण्याच्या भारताच्या आशांना मोठा झटका बसला आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये अपात्र ठरला आहे. डोप टेस्ट अयशस्वी झाल्याने सुमित मलिक टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भाग घेऊ शकणार नाही.


बुल्गारियातील सोफिया येथे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग 6-9 ते मे दरम्यान आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान सुमित मलिकची डोप टेस्ट झाली होती. दिल्लीच्या कुस्तीपटू सुमितने सोफियातच 125 किलो फ्री स्टाईल स्पर्धेसाठी ऑलिम्पिक तिकीट मिळवले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, भारताने ऑलिम्पिकमधील 125 किलो गटातील जागा गमावली आहे. यापूर्वी अशी अटकळ होती की सुमित मलिकला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापासून निलंबित केले जाणार नाही. पण आता हे स्पष्ट झाले आहे की सुमित मलिक यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.


उपांत्य फेरीत भारतीय कुस्तीपटू सुमित मलिकने व्हेनेझुएलाचा कुस्तीपटू जोस डॅनिएल डायझचा 5-0 असा पराभव करून रशियाच्या सर्गेई कोझरेव्हविरुद्ध अंतिम फेरी गाठली. मात्र दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली. या स्पर्धेत मलिकने रौप्यपदक जिंकले.


सोफियातील प्रत्येक प्रवर्गातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंना ऑलिम्पिक तिकिटे मिळाले होते. यावर्षी 23 जुलैपासून टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुरु होणार आहे. पुरुष गटात ऑलिम्पिक कोटा मिळवणारा मलिक चौथा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू ठरला होता. त्याच्या आधी रवी दहिया (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) यांनी ऑलिम्पिक तिकिटे जिंकली आहेत. टोकियो ऑलिम्पिकला अवघ्या 49 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना डोप टेस्टमध्ये मलिकच्या अपयशामुळे भारतीय कुस्ती संघाला पदक जिंकण्याची शक्यता कमी झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या