राजौरी : देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना आणि दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळालेला असतानाच शासनाकडून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. कोरोनाच्या संकटात लसींच्या वापराता मिळालेली परवानगी आणि त्यानंतर सुरु झालेली लसीकरण मोहिम म्हणजे एक मोठा दिलासा. पण, या मोहिमेतही काही अडथळे आरोग्य यंत्रणांपुढे उभे होते. 


लसींच्या तुटवड्यापासून ते अगदी लसीबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीपर्यंतच्या स्वरुपातील आव्हानं पार केल्यानंतर आता यंत्रणांपुढे अडचण आहे ती म्हणजे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लस पोहोचवण्याची. पण, यावरही कोविड वॉरियर्स अर्थात कोरोना काळात आरोग्य यंत्रणांमध्ये कामं करणाऱ्या मंडळींनी मात केली आहे. जम्मू - काश्मीरमध्ये नुकताच याचा प्रत्यय आला. 


Maharashtra Unlock : अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात; महापौर किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट 


जिथं, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा एक चमू, राजौरी जिल्ह्यातील कांदी ब्ल़ॉक या दुर्गम भागात लसीकरण मोहिम राबवण्यासाठी वाटेत असणारी नदीही़ पायी ओलांडली. सोशल मीडियावर या क्षणाची काही छायाचित्र अनेकांचं लक्ष वेधून गेली. इतकंच नव्हे, तर नेटकऱ्यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांचं तोंड भरुन कौतुक केलं. 






एएनआय या वृत्तसंस्थेनंही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लसींची साठवण केलेल्या शीतपेटीला सांभाळत गुडघाभर पाण्यातून हे कर्मचारी नदीचा प्रवाह ओलांडताना दिसत आहेत. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची ही समर्पक सेवा पाहता साऱ्यांनीच माणसातल्या या देवाला सलाम केला आहे. 


दम्यान मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेमध्ये देशात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अॅस्ट्राजेनिकासोबत मिळून देशात कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील  सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ला रशियाची स्पुटविक-V लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या माहितीच्या आधारे सांगितलं आहे की, लस परीक्षण आणि विश्लेषणासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून काही अटीशर्तींसह शुक्रवारी सीरमला परवानगी मिळाली आहे.