Indian Women's Hockey Team in Commonwealth Games: नुकतंच पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघानं (Indian Women's Hockey Team) निराशाजनक कामगिरी केली. या विश्वचषकात भारतीय संघाला 9 व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. मात्र, बर्मिंगहॅम येथे 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कर्णधार सविता पुनियाच्या (Savita Punia) नेतृत्वात भारतीय महिला हॉकी संघ चांगल प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा आहे. "हॉकी विश्वचषकातील चुकांमध्ये सुधारणा करत आम्ही कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करू", असा विश्वास सविता पुनियानं दर्शवला आहे. 


सविता पुनिया काय म्हणाली?
सविता म्हणाली की, "विश्वचषकात आम्ही क्षमतेनुसार खेळलो नाहीत. पण कॉमनवेल्थ स्पर्धेत आम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरू. भारतीय महिला हॉकी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत आम्ही नव्यानं सुरुवात करू. मला विश्वास आहे की, कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय संघ दमदार प्रदर्शन करेल." पुढे सविता म्हणाली की, आम्हाला आमच्या खेळात काही सुधारणा करण्याची गरज आहे. आमचं सर्व लक्ष चुकींच्या गोष्टींना मागं सोडण्यावर आहे. मला असं वाटतं की आम्ही चांगलं खेळत आहोत, पण सातत्यानं जिंकण्यासाठी आमच्या खेळात काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. 


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना कधी?
भारतीय महिला हॉकी संघ सोमवारी लंडनला रवाना झालीय. नॉटिंगहम येथील एका शिबिरानंतर भारतीय महिला संघ 23 जुलैला बर्मिंगहॅम येथे दाखल होईल. जिथे 29 जुलै रोजी भारताचा पहिला सामना घानाशी होणार आहे. येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर, 8 ऑगस्ट या स्पर्धेची सांगता होईल. 


कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय खेळाडूंची घोषणा
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे.


हे देखील वाचा-