Avinash Sable Loss Mens 3000m Steeplechase Final : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारताला एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के मिळाले. महाराष्ट्राचा (Maharashtra News) मराठमोळा पठ्ठ्या अविनाश साबळे (Avinash Sable) याला पुरुषांच्या तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत अकराव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. शर्यतीत अविनाश साबळेनं आठ मिनिटं आणि 14.18 सेकंदांची वेळ दिली. 


विनेश फोगाट, मीराबाईनंतर पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली. पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेसमध्येही भारताची निराशा झाली आहे. भारताचा अविनाश साबळे या शर्यतीत अकराव्या क्रमांकावर आहे. भारतीय स्टार खेळाडूनं 8:14.18 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. मोरोक्कोच्या सुफयान अल बक्कलीने 8:06.05 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलं. बक्कली सलग दुसऱ्यांदा हे सुवर्ण जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला.


29 वर्षीय भारतीय ॲथलीट अविनाश साबळे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिला आणि त्याचं पदक हुकलं. 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी सोमवारी, अविनाशनं पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पाचव्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती आणि इतिहास रचला होता. दरम्यान, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो भारतातील पहिला खेळाडू आहे. राष्ट्रीय विक्रम धारक साबळेनं दुसऱ्या हीटमध्ये 8 मिनिटं 15.43 च्या वेळेसह पाचवं स्थान पटकावलं होतं. तीन हीटमध्ये अव्वल 5-5 स्थानी राहिलेल्या धावपटूंना फायनलची तिकिटं मिळाली, पण महाराष्ट्राच्या आर्मी मॅनला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. आणखी एका पदकाची आशा मावळली.


बीडचा पठ्ठ्या, ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठून रचला विक्रम, अविनाश साबळे कोण? 


अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सरावामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनं पहिला नंबर पटकावला होता. अविनाशनं त्यानंतर धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचं एक-एक शिखर सर केलं आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचं शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही. अविनाशला पदक मिळवता आलं नसलं तरी त्यानं मनं नक्कीच जिंकली आहेत. ऑलिम्पिकच्या फायनल्ससाठी पात्र ठरणारा हा पहिला खेळाडू ठरला.