मुंबई : सुरुवातीच्या तब्बल चार सामन्यात बाकावर बसवल्यानंतर मागील तीन सामन्यात तोफगोळा फेकत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आज दुसऱ्यांदा पाच विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेविरुद्ध तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. सिराजने तीन विकेट घेतल्यानंतर शमीने फक्त 13 चेंडूत चार विकेट घेत श्रीलंकेला नेस्तनाबूत केले. त्यानंतर 10व्या क्रमांकावरील रजिथाला बाद करत पाच विकेट घेतल्या. 






वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज 


भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात तुफानी कामगिरी केली. शमीने संस्मरणीय कामगिरी करत फलंदाजांचे कंबरडे मोडले. शमीने एक विशेष कामगिरी केली असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.






शमीने वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 14 सामन्यांत 45 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 12.95 होती आणि इकॉनॉमी रेट 4.90 होता. या बाबतीत त्याने माजी गोलंदाज झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले. झहीरने 23 एकदिवसीय विश्वचषक सामन्यात 4.47 च्या इकॉनॉमी रेटने 44 विकेट घेतल्या. श्रीनाथ यांनी 34 एकदिवसीय विश्वचषक सामन्यात 4.32 च्या इकॉनॉमी रेटने 44 बळी घेतले.






तत्पूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. 358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराहने श्रीलंका क्रिकेट संघाच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला (0) LBW बाद केले. यासह बुमराह वनडे विश्वचषकात संघाच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.






भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या 3 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली, पण एकाही खेळाडूला शतक झळकावता आलं नाही. यासह भारतीय संघाने विश्वचषकात वैयक्तिक शतक न करता सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या