Dhananjay Munde : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तांत्रिक अडचणींमुळं काही केळी उत्पादक शेतकरी फळ पीकविमा योजनेत विहित वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. या  केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. 


फळ पीकविमा योजनेची मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला विनंती केली होती. केंद्र सरकारनं याची दखल घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग होण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार 2023-24 साठी केळी पिकाचा विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 हा होता. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 45731 अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत आपला सहभाग वाढवावा असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.


नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावं म्हणून ही योजना


प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. कृषी क्षेत्राच्या उत्पन्न वाढीमध्ये फळ पिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. फळ पिकांची मागणी जास्त असल्याकारणाने शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न सुद्धा चांगलंच आहे. उत्पन्न चांगला असला, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्यकारणाने फळ पिकांचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान, नैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस इत्यादीपासून संरक्षण मिळावं यासाठी राज्यात फळ पीकविमा योजना सुरू करण्यात आली.


चालू वर्ष 2023-24 साठी फळबागांना हवामान आधारित विमा अर्ज मागविण्यात येत असून कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास, अशा प्रकारचे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल, अन्यथा त्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे. या फळबाग विमा योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, द्राक्ष, सीताफळ, व लिंबू, इत्यादी फळपिकांचा समावेश आहे.


'या' योजनेची वैशिष्ट्ये



  • नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावा.

  • शेतकऱ्यांना बाजारातील नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.

  • फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो, अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करते.

  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी हा फळपिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या:


60 हजारच्या विमा संरक्षणासाठी 51 हजारांचा हप्ता! फळपीक विमा योजनेत पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यात सहा पटींनी वाढ