मुंबई : टीम इंडियाने आपला वर्ल्डकपमधील धुवाँधार कामगिरीचा आलेख कायम ठेवताना थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाच्या धुरंदरांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचल्यानंतर इंडियाची वेगवान त्रिमूर्ती असलेल्या मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) मोठा पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला.






मोहम्मद शमीने आज पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवताना पाच विकेट घेतल्या. वर्ल्डकपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत शमी प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. टीम इंडियाकडून गिल, कोहली आणि श्रेयस अय्यरचे शतक हुकल्यानंतर टीम इंडियाची त्रिमूर्ती श्रीलंकेवर तुटून पडली. तिघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. आशिया कपमध्ये श्रीलंकेला भारताने 51 धावात खुर्दा केला होता. त्यावेळी सिराजने सहा विकेट घेतल्या होत्या. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती टीम इंडियाने केली. 






श्रीलंकेचा एकही फलंदाज भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर तग धरू शकला नाही. एक प्रकारे पिनकोड डायल करावा, त्याप्रमाणे श्रीलंकेचे फलंदाजी कोसळत गेली. बुमराहने पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर पथुम निसंकाला बाद केल्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मियाँ मॅजिक मोहम्मद सिराजचे वादळ आलं आहे. या वादळात श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. डावाच्या दुसऱ्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर सिराजने दिमूथ करुणरत्नेला बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सादीराला सुद्धा त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर बाद करत त्याने दुसरा धक्का दिला. त्यानंतर कुशल मेंडिस सुद्धा एक धाव काढून सिराजचा तिसरा बळी ठरला.






तब्बल पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. दोन फलंदाज एका धावसंख्येवर बाद झाले.






सिराजने  फक्त 7 धावात 3 विकेट घेतल्या, तर शमीने 13 चेंडूत 4 विकेट घेत मुंबईच्या मैदानात लंकादहन केली. 






तत्पूर्वी,  श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. दिलशान मदुशंका श्रीलंकेसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच 80 धावा देत पाच बळी घेतले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माची (04) विकेट गमावली. मधुशंकाच्या पहिल्या चेंडूवर रोहितने चौकार मारला पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांना पुढील यशासाठी २९ षटकांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. सावध सुरुवातीनंतर कोहली आणि गिलने मैदानात चौफेर धावा केल्या.






कोहलीने मदुशंकावर चौकार मारून खाते उघडले तर गिलनेही या वेगवान गोलंदाजावर सलग दोन चौकार मारले. सहाव्या षटकात दुष्मंथा चमीराने (71 धावांत 1 विकेट) त्याच्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला तेव्हा कोहली 10 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर भाग्यवान ठरला. या षटकात भारतीय फलंदाजाने दोन चौकार मारले. भारताने पहिल्या पॉवर प्लेच्या 10 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 60 धावा केल्या. दुशान हेमंताच्या चेंडूवर दोन धावा करत कोहलीने 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर गिलनेही या लेगस्पिनरवर चौकार मारून 55 चेंडूत 50 धावांचा टप्पा ओलांडला.चमिरावर डावातील पहिला षटकार मारल्यानंतर गिल हेमंताच्या चेंडूवर देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. गिलने मधुशंकाच्या चेंडूवर चौकार मारून ९० धावांपर्यंत मजल मारली पण त्याच षटकात थर्ड मॅनवर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षक कुसल मेंडिसच्या हाती झेलबाद झाला.






त्याच्या पुढच्याच षटकात मधुशंकाने संथ चेंडूवर शॉर्ट कव्हरवर कोहलीला पथुम निसांकाकडून झेलबाद करून भारताला दुहेरी धक्का दिला. मात्र, या खेळीदरम्यान एका कॅलेंडर वर्षात विक्रमी आठव्यांदा एक हजार धावांचा आकडा पार करण्यात कोहलीला यश आले. सात वेळा हा पराक्रम करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याने मागे सोडले. अय्यर सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने कसून रजितावर दोन षटकार आणि हेमंतावर एक षटकार मारून आपली वृत्ती दाखवून दिली. रजितावरील त्याचा दुसरा षटकार हा सध्याच्या विश्वचषकातील 106 मीटर सर्वात लांब षटकार होता.






19 चेंडूत 21 धावा केल्यानंतर लोकेश राहुल चमेराच्या चेंडूवर हेमंतकरवी झेलबाद झाला तर मदुशंकाने सूर्यकुमार यादवला (12) यष्टिरक्षक मेंडिसकडे झेलबाद करून भारताला पाचवा धक्का दिला. अय्यरने महिष टेकशनाच्या चेंडूवर चौकार मारून अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या 300 धावा 45व्या षटकात पूर्ण झाल्या.48व्या षटकात अय्यरने मदुशंकाला लागोपाठ दोन षटकार ठोकले पण पुढच्याच चेंडूला ते हवेत उडवत तीक्षनाने त्याचा झेल घेतला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी जडेजाने चमीरावर षटकार ठोकला.


इतर महत्वाच्या बातम्या