जयपूर: देशातील पैशाचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून कारवाई करणाऱ्या, अनेक भ्रष्टाचारी राजकारणी आणि अधिकाऱ्यांना घाम फोडणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक (ED Officer Arrested For Bribe) करण्यात आली आहे. राजस्थानच्या लाचलुचपत विभागाने (Rajasthan ACB) ही कारवाई करत नवल किशोर मीना या ईडीच्या अधिकाऱ्याला 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
राजस्थान लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त महासंचालक हेमंत प्रियदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या इंफाळमध्ये कार्यरत असलेल्या नवल किशोर मीना या अधिकाऱ्याने एका व्यक्तीकडे 17 लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराची इंफाळमधील मालमत्ता जप्त न करण्याच्या बदल्यात आणि इंफाळमधील चिटफंड घोटाळ्यात त्याला अटक न करण्याच्या बदल्यात ही लाच मागितली जात होती. त्यासंबंधी एसीबीकडे एक तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, जयपूरमधील एसीबीचे उपमहानिरीक्षक डॉ. रवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवल किशोर मीना आणि त्याचा साथीदार बाबूलाल मीना यांना 15 लाखांची लाच घेताना पकडले. नवल किशोर आणि बाबूलाल मीना दोघेही मूळ जयपूरमधील बस्सीचे रहिवासी आहेत.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूर पोलीस यासंबंधी पुढचा तपास करत आहेत.
ही बातमी वाचा: