New Zealand vs Afghanistan : सामन्यावर भक्कम पकड मिळवूनही त्यानंतर झालेली सुमार गोलंदाजी, त्याचबरोबर सुमार क्षेत्ररक्षण आणि त्याच्यापेक्षाही केलेल्या बेजबाबदार फलंदाजीमुळे अफगाणिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने आपल्या चौथ्या सामन्यामध्ये आफगाणिस्तानचा तब्बल 149 धावांनी पराभव करत स्पर्धेत मोठा विजय नोंदवला. या विषयासह न्यूझीलंडने गुणतालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यामुळे भारत दुसऱ्या स्थानी घसरला. 






न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडने 288 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, या धावांचा पाठलाग करताना अफगाण फलंदाजी अत्यंत सुमार झाली. त्यांचा संपूर्ण संघ 139 धावांमध्ये आटोपला. तिसऱ्या क्रमांकावर झालेल्या रहमत शहाची 36 धावांची खेळी अफगाणिस्तानच्या डावातील सर्वात मोठी खेळी ठरली.






मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न झालेली पार्टनरशिप अफगाणिस्तानच्या पराभवला कारणीभूत ठरली. अफगाणिस्तानकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी उभारण्यात यश आलं नाही. त्यामुळे ठराविक अंतराने विकेट गमावल्याने अफगाणिस्तानवर पराभव ओढवला. अफगाणिस्तानचे शेवटचे सात फलंदाज अवघ्या 42 धावांमध्ये गमावल्याने दारुण पराभव झाला.






न्यूझीलंडकडून मिशेल सँटनेर आणि लाॅकी फर्ग्युसन यांनी भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन-तीन गडी बाद केले. त्यांना बोल्टने दोन गडी बाद करत चांगली साथ दिली. तर मॅट हेन्री आणि रचिन रविंद्र यांनी एक एक विकेट घेत मोलाची भूमिका बजावली. इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे या सामन्यामध्ये अफगाणकडून जोरदार प्रतिकार केला जाईल, असं वाटलं जात होतं. मात्र, असा कोणताही प्रतिकार हा अफगाणिस्तानकडून दिसून आला नाही. 




अत्यंत सुमार दर्जा क्षेत्ररक्षण अफगाणिस्तानच्या पराभवला कारणीभूत ठरले. न्यूझीलंडची 4 बाद110 झाली होती. मात्र, त्यानंतर सामन्यावरची पकड त्यांना कायम ठेवता आली नाही. अखेरच्या षटकांमध्ये दिलेल्या धावा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.