Agriculture News : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शुभारंभालाचा सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनला 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळत आहे. मात्र, मिळालेल्या या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडात पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
खरीपातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. नव्याने निघालेले सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी आले असता शुभारंभालाच 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा क्विंटलला दर मिळत आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त होत असून, यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
तेल आणि सोयाबीन ढेप आयात, दरांवर परिणाम
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी 3 लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. मागच्या वर्षी सोयाबीनला 6 हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव होता. यावर्षी सुरुवातीलाच 3800 रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. यामुळे सोयाबीनची सोंगणी करायची की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तेल आणि सोयाबीन ढेप आयात होत असल्याने बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत. पुढील काळात हे दर काय असतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.
दसरा दिवाळी या सणांच्या तोंडावर महागाई कमी करताना शेतकऱ्यांच्या शेत-मालावर त्यांचे गंभीर परिणाम होतानाचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे. यातून शेतकयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.