कोलंबो (श्रीलंका): भारत, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेत, टीम इंडियाचा दुसरा सामना आज बांगलादेशशी होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
सलामीच्या लढतीत टीम इंडियाला श्रीलंकेकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात शिखर धवनच्या दमदार खेळीनं, टीम इंडियाला 174 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र गोलंदाजांना या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.
त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दबावाखाली असलेली रोहित शर्माची टीम इंडिया या मालिकेत पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत.
2016 मध्ये थरारक सामना
भारत आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा टी ट्वेण्टी सामना 2016 मध्ये टी ट्वेण्टी विश्वचषकात खेळवण्यात आला. अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात भारताने अवघ्या 1 धावेने निसटता विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने 146 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 145 धावाच करता आल्या होत्या.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (विकेटकीपर)
संबंधित बातम्या
श्रीलंकेची विजयी सलामी, भारतावर 5 विकेट्स राखून मात