Ajaz Patel :  भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) विश्वविक्रम करणाऱ्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलला बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्यांच्या 13 सदस्यीय संघातून फिरकी गोलंदाज एजाज पटेलला वगळले आहे. डावखुरा फिरकीपटूने या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत भारताविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेत इतिहास रचला होता.  


रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलमध्ये या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे, त्यामुळं एजाजला जागा मिळाली नाही. त्याला संघात स्थान न मिळाल्यानं न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी प्रतिक्रिया दिली असून ऐतिहासिक स्पेल टाकून बाहेर पडणे दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतात एजाजच्या रेकॉर्डब्रेक प्रदर्शनानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटणे सहाजिक आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ संघनिवडीवर भर दिला आहे. आम्ही बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर ज्या पद्धतीने निवडले ते खेळाडू उत्तम प्रकारे खेळी करतील असा विश्वास आहे, असं स्टेड यांनी एका निवेदनात म्हटले आहे.






न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं (Ajaz Patel) भारताविरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली होती. एजाजनं एका डावात भारताच्या दहाही फलंदाजाला बाद करून इतिहास रचलाय. एका डावात दहा विकेट्स घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला होता. या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 विकेट्स घेतल्या होत्या. 


न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म 1988 साली मुंबईत झाला. ज्यानंतर 1996 मध्ये एजाजचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं. दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजाजनं आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी आज मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली होती.