Shivsena Activist file compalaint against Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत दोन समाजात तेढ निर्माण केली असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून नितेश राणे यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यानंतर नितेश राणे शिवसेनेविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. 


भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटसह त्यांनी फोटोदेखील पोस्ट केला. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटचे पडसाद उमटले. नितेश राणे यांच्या ट्वीटमधील माहिती दिशाभूल करणारी असल्याचे अनेकांनी म्हटले. तर, या फलकाच्या मुद्यावरून शिवसेनेवरही अनेकांनी टीका केली.






 


शिवसेनेने नितेश राणे यांच्या ट्वीटची दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी केली आणि ट्वीटरच्या माध्यमातून खोटी बातमी पसरवून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नगरसेवक अरविंद भोसले यांनी ही तक्रार दाखल केली आहे.  भाजप आमदार नितेश नारायण राणे यांच्या ट्वीटरवरील बेताल वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलिस ठाणे येथे निवेदन दिले. नगरसेवक अनिल कोकीळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  


महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर आता राणे यांच्या ट्वीटवरून शिवसैनिक नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसैनिक विरुद्ध राणे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha