मुंबई: फुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या मैदानातही बेशिस्त खेळाडूवर कारवाई करण्यासाठी पंचांना लाल कार्ड वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. एमसीसीनं क्रिकेटच्या नियमावलीत नुकतेच बदल केले आहेत. त्यानंतर आयसीसीनंही सदर बदलांचा प्लेईंग कण्डिशन्समध्ये अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली.


त्यानुसार 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीच्या नव्या प्लेईंग कण्डिशन्स लागू होतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या नव्या प्लेईंग कण्डिशन्स

  • फुटबॉलच्या धर्तीवर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पंचांना लाल कार्ड वापरण्याचा अधिकार

  • शिस्तभंगाच्या गंभीर प्रकरणात लाल कार्ड दाखवून, त्या खेळाडूला मैदानातून बाहेर काढण्याचा आता पंचांना अधिकार

  • क्रिकेटच्या खेळात समतोल राखण्यासाठी बॅटच्या आकारमानावर मर्यादा. बॅटच्या कडेची जाडी ४० मिमीपेक्षा आणि खोली ६७ मिमीपेक्षा मोठी नसावी

  • डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम म्हणजे डीआरएसचा आता ट्वेन्टी२० सामन्यांमध्येही वापर

  • कसोटी सामन्यामध्ये एका डावात केवळ दोनच रिव्ह्यू वापरण्याची संधी. ८० षटकांनंतर मिळणारे जादा रिव्ह्यू आता मिळणार नाहीत.

  • फलंदाजानं मैदानात बॅट घासत क्रीज ओलांडलं, पण त्याच्या हातातून बॅट सुटली आणि तो क्रीजमध्ये पोचायच्या आत क्षेत्ररक्षकानं चेंडूनं यष्ट्या उडवल्या तरी धावचीतचं अपील फेटाळण्यात येईल.